Ad will apear here
Next
‘बीओसीडब्ल्यू’ तर्फे बांधकाम कामगारांना १९ कोटी रुपयांचे लाभ वितरीत
‘क्रेडाई पुणे मेट्रो’तर्फे आयोजित कामगारांच्या नोंदणीबाबत विशेष कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कामगार विभागाचे अतिरिक्त आयुक्त शैलेंद्र पोळ . या वेळी जे. पी. श्रॉफ, विकास पनवेलकर व एम. ए. मुजावर उपस्थित होते.

पुणे : ‘‘बीओसीडब्ल्यू’ अर्थात ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’मार्फत पुण्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आतापर्यंत १९ कोटी रुपयांचे लाभ वितरीत करण्यात आले असून, ३४ हजार कामगारांना त्याचा फायदा मिळाला आहे,’ अशी माहिती कामगार विभागाचे अतिरिक्त आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दिली.

‘क्रेडाई पुणे मेट्रो’ या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे कामगारांच्या नोंदणीबाबत कंत्राटदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  या वेळी पोळ बोलत होते. दोनशेहून अधिक कंत्राटदार या वेळी उपस्थित होते. कामगार उपायुक्त विकास पनवेलकर, कामगार अधिकारी एम. ए. मुजावर, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट, कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, क्रेडाई पुणे मेट्रोचे रणजीत नाईकनवरे, आदित्य जावडेकर, समीर बेलवलकर, कामगार कल्याण समितीचे निमंत्रक पराग पाटील,  क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापिका उर्मिला जुल्का, संस्थेचे कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी या वेळी उपस्थित होते.    

‘जेव्हा बांधकामाच्या ठिकाणी दुर्घटना घडतात तेव्हा त्यातील कामगारांची मंडळाकडे नोंदणी नसल्याचे अनेकदा समोर येते. दुर्घटना टाळण्याच्या प्रयत्नांबरोबरच अनोंदणीकृत कामगारांची संख्या शून्यावर आणणे आवश्यक आहे, असे सांगून पोळ म्हणाले, ‘कामगारांना काम देणारा कंत्राटदार हा एक प्रकारे त्यांच्यासाठी मालकच असतो. त्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगाराची ‘बीओसीडब्ल्यू’ मंडळाकडे नोंदणी आहे की नाही हे तपासणे आणि नोंदणी नसल्यास ती त्वरित करून घेणे हे कंत्राटदाराचे कर्तव्य आहे. यात कंत्राटदाराचे काहीही नुकसान नाही. उलट या माध्यमातून त्य़ाची अर्धी जबाबदारी सरकार उचलणार आहे. कामगार निर्धास्त मनाने काम करू लागला, तर कंत्राटदार त्याच्याकडून अधिक गुणवत्तापूर्ण कामाचा आग्रह धरू शकेल.’

‘यापुढे प्रत्येक बांधकाम कामगाराची नोंदणी झाली पाहिजे असा आग्रह धरला जाणार असून, कंत्राटदारांनी कामगारांची नोंदणी करून घेण्यास पुढाकार घेतल्यास विकसकांना अडचण सोसावी लागणार नाही,’ असेही पोळ यांनी सांगितले.

कंत्राटदारांना माहिती देताना पोळ म्हणाले, ‘प्रत्येक कंत्राटदाराने एकाच कामगाराची वेगवेगळी नोंदणी करून घ्यायची आवश्यकता नाही. कामगार तुमच्याकडे कामाला लागण्याच्या वेळी त्याच्याकडे बीओसीडब्ल्यूचे पुस्तक आहे का, हे विचारा आणि त्याची नोंदणी नसल्यास ती करून घ्या. प्रतिवर्षी नोंदणीचे नूतनीकरण करून घ्या. कामगारांबरोबर मुकादम (सुपरवायझर), प्लंबर, रंगारी, वॉचमन आणि कारकुनांचीही बीओसीडब्ल्यू नोंदणी करून घ्या. या नोंदणीला कामगाराचे आधारकार्ड लिंक केले जाते. कामगार कोणत्याही राज्यातील असेल आणि त्याची महाराष्ट्राच्या बीओसीडब्ल्यू विभागाकडे नोंद असेल तरी तो या ठिकाणी लाभांसाठी पात्र ठरतो.’

मुजावर यांनी कामगार नोंदणीची प्रक्रिया व या नोंदणीद्वारे सरकारकडून मिळणाऱ्या लाभांची माहिती दिली. यात कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर आर्थिक मदत, आरोग्य योजनेतील समावेशाबरोबरच कामगाराच्या कुटुंबीयांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी, कामगारास अपंगत्त्वासाठी, त्याच्या पत्नीस प्रसूतीसाठी विशेष आर्थिक मदत, कामगारांना देण्यात येणारे सुरक्षा किट आदींचा समावेश आहे.

मर्चंट म्हणाले, ‘कामगारांच्या मनात नेहमी उद्या आपले व कुटुंबाचे कसे होणार याची चिंता असते. ‘बीओसीडब्ल्यू’ नोंदणीद्वारे मिळणाऱ्या लाभांमुळे ती चिंता काही प्रमाणात निश्चित कमी होईल आणि त्याच्या कामाचा दर्जा वाढेल. हे लाभ मिळणे हा कामगारांचा न्याय्य हक्क आहे.’

‘लवकरच बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी अगदी अल्प दरात चांगले जेवण उपलब्ध करून देण्याची योजना ‘बीओसीडब्ल्यू’मार्फत राबवली जाणार आहे. कामगारांना या मंडळाद्वारे जवळपास २८ प्रकारचे लाभ दिले जात असून प्रत्येक कामगाराला नोंदणीद्वारे ते प्राप्त होतील याची काळजी कंत्राटदारांनी व विकसकांनी घ्यायला हवी,’ असे जे. पी. श्रॉफ यांनी सांगितले.

या वेळी रमेश सुतार आणि मेहराज पठाण या बांधकाम कंत्राटदारांनी आपले मनोगत व्यक्त केले. ‘बीओसीडब्ल्यू’कडे कामगारांची नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या लाभांमुळे कामगार कामावर आनंदी असतात; तसेच आपल्याकडे येणाऱ्या कामगारांची संख्याही वाढली असे त्यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZNTCB
Similar Posts
महिला कामगार करणार गवंडीकामही; प्रशिक्षणाने दिला आत्मविश्वास पुणे : इमारत बांधकामाच्या ठिकाणी महिला प्रामुख्याने दिसतात त्या ओझी वाहण्याचे काम करताना; पण पुण्यातील काही इमारतींच्या बांधकामाच्या ठिकाणी आता महिला कामगार गवंडीकाम करतानाही दिसणार आहेत. ‘क्रेडाई’तर्फे काही महिलांना त्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, कौशल्यवृद्धीमुळे या कामगारांना कामाचा अधिक मोबदला मिळणार आहे
बांधकाम कामगारांना मिळणार पाच रुपयांत जेवण पुणे : दिवसभर अंगमेहनतीचे काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना आता कामाच्या ठिकाणी केवळ पाच रुपयांत दुपारचे जेवण उपलब्ध होणार आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दररोज स्वच्छ आणि गरम जेवण मिळावे यासाठी सरकारने सुरू केलेल्या ‘अटल आहार योजने’चा क्रेडाई पुणे मेट्रोच्या सहकार्याने पुण्यात प्रारंभ करण्यात आला.
‘क्रेडाई’तर्फे वारकऱ्यांना प्रथमोपचार पेट्यांचे वाटप पिंपरी-चिंचवड : ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ संघटनेच्या बांधकाम व्यावसायिकांनी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांना तब्बल अडीच हजार प्रथमोपचार पेट्यांचे वाटप केले. निगडी येथे भक्ती-शक्ती चौकात हा कार्यक्रम झाला.
‘डॅनिश टॅलेंट कँप’ स्पर्धेत पुण्याच्या कामगारांची बाजी पुण्यातील रमजान मोमीन आणि मोहम्मद राबिथ कुन्नमपल्ली या बांधकाम कामगारांनी डेन्मार्कमध्ये नुकत्याच झालेल्या ‘डॅनिश टॅलेंट कँप’ स्पर्धेत आपली चमक दाखवली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language